अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या सुमारे २० आमदारांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे.
या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे पत्र पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आल्याचे आता समोर आले आहे.
यावर सुमारे वीस आमदारांच्या सह्या असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदाराचाही समावेश असल्याची माहिती मिळाली. राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले जाते.
राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांना कमी निधी मिळतो. तसेच पक्षातील वरिष्ठ मंत्री आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. यासाठी आमदारांनी ३ किंवा ४ एप्रिलला सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.