मित्रानेच काढला मित्राचा काटा

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून घडला प्रकार : सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश : पर राज्यातील दोघांना अटक

प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. श्रीरामपूर एमआयडीसीत सहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

पथकाने परराज्यातील दोन इसमांना अटक केली आहे. भुपेंद्र शिवप्रसाद रवि व सूरज रामनाथ रावत (दोघे रा. सुनीरा, ता. अमरपाटण, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांची नावे आहेत. आरोपींना श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात एलसीबीच्या पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा गावच्या शिवारात १८ जानेवारी २०२३ रोजी अज्ञात इसमाचा खून झाला होता. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात इसमाला खड्यात टाकण्यात आले होते. या प्रकरणी पोना मच्छिंद्र शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि. दिनेश आहेर यांना तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

खून झालेला इसम मध्य प्रदेश राज्यातील असल्याने पोलिसांनी बारकावे शोधले. तपासाअंती मध्य प्रदेशातील आरोपी भुपेंद्र शिवप्रसाद रवि याच्याकडे संशयाची सुई फिरली. पोनि. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर गोसावी,

दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, फुरकान शेख, सागर ससाणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर तसेच पोना विराप्पा कमल हे पथक मध्य प्रदेशला रवाना झाले. अज्ञात मयताच्या मोबाईलद्वारे पोलिस पथक मध्य प्रदेशात पोहोचले तो मोबाईल मयत सोनू समरालाल चौधरी याचा होता.

मोबाइलद्वारे पोलिस पथकाने मयत सोनू चौधरी याच्या नातेवाईकांची भेट घेतलो सोनू चौधरी हा हरवला असल्याची तक्रार तेथील पोलिस ठाण्यात नोंदविणवात आली होती. नातेवाईकांनी मयत सोनू चौधरी हा त्याचा मित्र भुपेंद्र शिवप्रसाद रवी (हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याकडे गेला असल्याचे सांगितले,

भुपेंद्र शिवप्रसाद रवि वास ताब्यात घेतल्यानंतर त्याने सूरज रामनाथ रावत यांच्या मदतीने सोनू चौधरी याचा खून केल्याचे कबूल केले. भूपेंद्र रवि व मयत सोनू चौधरी हे मित्र होते. मयत सोनू चौधरी याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. सदरील महिलेचे तिच्या पतीशी वाद झाल्याने ती मयत सोनू चौधरी याचा मित्र भूपेंद्र याच्याकडे श्रीरामपूर येथे आली होती.

भुपेंद्र याने तिला लोणी येथे एक खोली घेवून दिली होती. तो देखील तिच्यासोबत राहत होता. सदरील महिलेचे मयत सोनू चौधरी याच्याशी देखील प्रेमसंबंध आहेत आणि ती सोनू चौधरी याच्यासोबत लग्न करणार,

अशी माहिती भुपेंद्रला समजली. या गोष्टीचा राग भूपेंद्रला आल्याने व प्रेमात अडथळा बनल्याने त्याने सोनू चौधरीला सदरील महिला श्रीरामपूर येथे आहे, असे सांगून बोलावून घेतले. श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात आणून सोनू चौधरीला दारू पाजून, लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे ठार मारले, सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात एलसीबीची यश आले आहे.