३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : तीन दिवसांपासून शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू आहे.मंगळवारी बेलापूर रोडपासून सुरू झालेली ही मोहीम बुधवारी गोंधवणी रोडवर राबविल्यानंतर काल गुरूवारी छत्रपती शिवाजी चौकातून नेवासा रोडवर राबविली.अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठ विस्कळीत झाली आहे.पालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेमध्ये विदारक चित्र निर्माण झाले आहे.
काल गुरूवारी सकाळी अतिक्रमण मोहिमेचे पहिले लक्ष्य छत्रपती शिवाजी चौकातील भेळीचे दुकान व नेहरू भाजी मार्केट ठरले. या ठिकाणी मार्केटच्या बाहेर असलेले सर्व फ्रूट स्टॉल काढण्यात आले. त्यामुळे प्रथमच भाजी मार्केटचा घड्याळाचा टावर व पूर्ण मार्केट लोकांना पहावयास मिळाले.त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या संपूर्ण गाळ्याची लाईन दोन जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.त्यामुळे पोलीस ठाण्याची पूर्ण इमारत देखील लोकांना दिसू लागली. या संपूर्ण भागातील दुकानदार, व्यवसायिकांचे सर्व गाळे काढून टाकण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासात पोलीस ठाण्यासमोर गाळ्यांची असलेली मागील भिंतीच्या विटा आणि समोरचे पत्रे यांचा खच पडलेला होता.

गेली तीन दिवस सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक विस्थापित होणार आहेत. अनेकांची दुकाने नेस्तनाबूत झाली आहे.छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व लोकांचे चेहरे सुन्न झाले असून भविष्यामध्ये व्यवसाय कशा पद्धतीने करायचा ? असा प्रश्न पडला आहे. नेहरू मार्केटसमोर जवळपास ६० ते ७० फुटापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. तर समोरच्या बाजूने गुरुनानक मार्केटमध्ये ४० फुटापर्यंत अतिक्रमणे मुक्त झाली.
याबाबत काही व्यवसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातला असता, नेहरू मार्केटमधील संपूर्ण जागा ही नगरपालिकेच्या मालकीची आहे. म्हणून ती मोकळी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दुपारपर्यंत ही मोहीम जोरात राबविण्यात आली. पुढे एसटी स्टँडकडे जाणाऱ्या रोडवर दुकानदार स्वतःहून आपली अतिक्रमणे काढत असल्याने त्यांना थोडी सवलत देण्यात आली. त्यानंतर पालिकेचा ताफा संगमनेर रोडकडे रवाना झाला. त्या भागात देखील बहुतांश लोकांनी आपली अतिक्रमणे आधीच काढून घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना फारसा त्रास झाला नाही.
शिवाजी चौक, गुरुनानक मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्टँडपासून पुढेदेखील सर्व दुकानदारांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका कर्मचाऱ्यांना त्यांना फारसे सांगावे लागले नाही. गेले तीन दिवस शहरामध्ये सर्व रस्त्यांवर लोकांनी स्वतः केलेल्या अतिक्रमणे स्वतःच काढत आहेत. त्यामुळे कधी काळी श्रीरामपुरात असे सुद्धा होईल याची कल्पना कोणी केली नव्हती.
नगरपालिका देखील जबाबदार
शहरामध्ये मोठ्या संख्येने अतिक्रमणे झाली, ती आता नगरपालिका काढत आहे; परंतु यापूर्वीच अतिक्रमणे काढली असती तर इतके नुकसान झाले नसते. अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करून अतिक्रमणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे नागरिकांवर आज ही वेळ ओढावली आहे. याबद्दल शहरातील नागरिकांनी नगरपालिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
जलवाहिन्यांसह गटारी मोकळ्या करणार
शहरातील जनतेला चांगली सेवा देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे; मात्र अतिक्रमणामुळे आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहे. त्यामुळे फक्त रस्तेच नव्हे तर पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या तसेच ज्या-ज्या गटारींवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. ते देखील काढले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावी व आपले नुकसान टाळावे,असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.













