Shrirampur News : श्रीरामपूर येथील रेल्वेच्या प्रस्तावित मालधक्क्यामुळे या परिसरामध्ये राहात असलेले व व्यवसाय करणारे हजारो नागरिक विस्थापित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी हा मालधक्का हलवणार असल्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.
श्रीरामपूरातील नेवासा रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने बांधण्यात येणाऱ्या माल धक्क्याच्या जागी सध्या माल भरणे व उतणे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.

त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक लहान बालकांना दम्याचा आजार सुरू झाला आहे. तसेच या ठिकाणी पाच ते सहा महाविद्यालय व प्राथमिक शाळा,
पाच ते सहा हॉस्पिटल व नागरी वस्ती असल्यामुळे हजारो लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर खासदार लोखंडे यांची परिसरातील नागरिकांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी खासदार लोखंडे बोलत होते.
यावेळी नागरिकांनी सांगितले, की या मार्गावर रेल्वे अधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी रेल्वेची जागा सोडून भिंत बांधली त्यामुळे नागरिकांनी या परिसरात आपले उद्योग व्यवसायही सुरू केले; परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने रेल्वे मालधक्का बांधण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा मालधक्का रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा एमआयडीसी या ठिकाणी नेल्यास या ठिकाणी शासनाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मालधक्का तेथे हलवण्यात यावा, अशी मागणी सर्व नागरिकांनी केली. यावेळी श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने नेवासा रोडवरील नागरिकांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.
याप्रसंगी खासदार लोखंडे म्हणाले की, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्तावित रेल्वे मालधक्का इतर ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करू.
याप्रसंगी नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, संजय गांगड, विकास डेंगळे यांनी म्हणणे मांडले. यावेळी पुरुषोत्तम झंवर, प्रवीण गुलाटी, बाळासाहेब खाबिया, गौतम उपाध्ये, अनिल लुला, लकी सेठी, चरण त्रिभुवन,
विकास डेंगळे, उमेश अग्रवाल, नानासाहेब गांगड, बाबासाहेब शिंदे, मनोहर रामनानी, युवराज घोरपडे, मोहन अग्रवाल, गणेश कटके, प्रसाद कटके, अलीम शेख, मुबारक शेख, राहुल रणपिसे, सोनाबाई रजपूत, सुरेखा लोळगे, मंगल लोळगे, मनीषा मोरे आदी उपस्थित होते.