अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटक मध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अन्वये कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळ संचालकांना आदेश जारी केले आहेत.
शिर्डी विमानतळावर जगभरातून भाविक श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तेव्हा नवीन व्हेरिएंट च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. यासाठी कोपरगांव व राहाता पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, काकडी व कोऱ्हाळे येथील आरोग्य पथकाची विमानतळावर नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकाने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांची नोंद ठेवावी, तपासणी करावी व याबाबतचा अहवाल दररोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोपरगांव तहसीलदार यांना सादर करावा.
अशा सूचना ही सदर आदेशात दिल्या आहेत. विमानतळावर थॅर्मल स्कॅनर, सॅनिटायझर व प्रवाशांना हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी. जंतुनाशकाने विमानतळ प्रवाशी बैठक कक्ष व परिसराची फवारणी करण्याची दक्षता घ्यावी.
कोरोना नवीन व्हेरिएंट, कोरोना नियमावली बाबत माहितीपत्रके, ध्वनीक्षेपकांद्वारे सार्वजनिक उद्घोषणा, बॅनर यामाध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शारिरीक अंतर, मुख्यपट्टीचा वापर व हात वारंवार स्वच्छ धुणे हे कोरोना प्रतिबंधात्मक वर्तन प्रवाश्यांना बंधनकारक करण्यात यावे.
विमानतळावर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींला क्वारंटाईन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. असे आदेश ही कोपरगांव तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी दिले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम