अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- नाशिक- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री सी.पी. जोशी यांच्याकडे ना. थोरात यांनी पाठपुरावा करून 9 किमीचा बिनाटोल बायपास मंजूर करून घेतला होता.

त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण होऊन शहरातील वाहतूक बाहेर मार्गाने वळविली. संगमनेर शहरात नव्याने इंजिनियरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
दरम्यान पुणे- नाशिक महामार्गावरून संगमनेरकडे येताना व या महामार्गावर जाताना रस्त्यांच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघातप्रवण क्षेत्र झाला होता. याठिकाणी काही अपघात झाल्याने ना.
थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत या उड्डाणपुलाच्या कामाकरिता 38 कोटी रुपये निधी मिळविला आहे. यामुळे अद्ययावत उड्डाणपूल उभा राहणार असून या उड्डाणपुलामुळे सर्वांची सोय होणार आहे.