आठवडे बाजार बनतोय चोरट्यांचा ‘हॉट स्पॉट’… सरपंचांचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहे. विशेष बाब म्हणजे आठवडे बाजारा शेजारीच पोलीस चौकी आहे.

मात्र बुधवारी भरणार्‍या बाजारच्या दिवशीही चौकी बंद राहात असल्यामुळे चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. नेवासा पोलीसांनी या मोबाईल चोरांचा शोध घेवून जेरबंद करावे,अशी मागणी नागरीक करीत आहेत.

अधिक माहिती अशी कि, प्रवरासंगमच्या बाजारात परिसरातील 10 ते 12 गावातील नागरीकांची मोठी गर्दी होत असते. नागरीक भाजीपाला घेण्यास दंग असताना त्यांचे लक्ष विचलीत करून त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत आहेत.

मागील महिनाभरापासून आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रवरासंगम चा आठवडा बाजार पोलीस चौकी शेजारीच भरतो तरीही हे चोर चोरीचे धाडस करतात हे विशेष आहे.

त्यामुळे पोलिसांनी मोबाईल चोरीच्या तक्रारीची दखल घेवून तत्काळ गुन्हा दाखल करावा तसेच आठवडे बाजारात सापळा रचून या मोबाईल चोरांना पकडून जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ व आसपासच्या गावातील नागरिक करीत आहेत.

दरम्यान, नागरीकांनी बाजारात खरेदी करताना आपला मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. बाजारात संशयास्पद वावरताना व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवरासंगमच्या सरपंच अर्चना संदीप सुडके यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe