Ahmednagar Politics : दुसऱ्यांच्या कामाच्या कागदपत्राची प्रशासकीय मान्यता चोरून कामाचे श्रेय घेणारा मी नाही. जिल्हा परिषद मध्ये प्रशासक लागले म्हणून सत्तेचा गैरवापर करुन प्रशासकीय मान्यता घ्यायचे व खिरापत वाटल्यासारखी मी कामे मंजूर केले असे दाखवायचे.
अशी लबाडाची टोळी सध्या तयार झाली आहे. वडगाव, पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांच्या जामिनीवर असलेले शासनाचे शिक्के महाविकास आघाडीने काढले आहेत, याचे श्रेय कुणी घेऊ नये. असा टोला आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लावला.
नगर तालुक्यातील वडगाव पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांच्या जामिनीवरील शिक्के काढल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने आ. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके यांचा नागरी सत्कार व पेढे तुला कार्यक्रम आयोजित केला होता, या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच भानुदास सातपुते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहीदास कर्डीले, राम झिने, रघुनाथ झिने, प्रकाश डोंगरे, राजू ढेपे, बाबा शेवाळे, मच्छिंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. लंके म्हणाले सातबाऱ्यावरील शिक्क्या संदर्भात मी शब्द दिला होता. आमदार झाल्यावर शिक्का काढेल माझ्या शब्दात दम होता तो मी व आ. तनपुरेंनी पाळला. आ. प्राजक्त तनपुरे व मी आमदार झालो. के. के. रेंजचा ५० वर्षापासूनचा प्रश्न माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून तो आम्ही सोडवला. के के रेंज मधील जमिनीसाठी या भागातील लोकप्रतिनिधीचा विरोध होता. या सर्व कामाचे हे आता फुकटचे श्रेय घेत आहेत.
आम्ही केलेल्या कामाचे बोर्ड लावत आहेत. यांची यंत्रणा शासकीय पगार घेते त्यांची कामे करतात त्यांचा बंदोबस्त करणार आहे. पंढरपूरला जायचे दांडा आमचा झेंडा आमचाच आता अशी लोक आहेत की आमचा दांडा आणि झेंडा घेऊन पंढरपूरला निघाले आहेत.
तुमचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. जे फोटो काढायला होते त्यांचाच विरोध एमआयडीसी शिक्के काढण्यासाठी होता. हा सर्व पाठपुरावा महाविकास आघाडीच्या काळात झाला आहे. आमचे श्रेय नसते तर आम्ही आलो नसतो जे कामे मंजूर करतो त्याच कामाचे श्रेय आम्ही घेतो.
सध्या लबाडची टोळी तयार झाली आहे. आम्ही कामे मंजूर करायची आणि श्रेय घ्यायला त्यांनी पुढे यायचे. राजकीय दबाव आणायचा सत्येचा वापर करायचा. खोटे पुरावे सादर करायचे. माझ्या तालुक्यात मी मंजूर केलेल्या जलजीवन योजनेचे उद्घाटन केले.
मी कामे मंजूर केली मी पाठपुरावा केलेले कागदपत्र पत्रकार परीषदेमध्ये दाखवले तेव्हापासून नारळ फोडण्याचा उद्योग बंद झाला. मी व आ. प्राजक्त तनपुरे मुळेच हे शिक्के काढले आहेत. माजी उद्योगमंत्री अदिती तटकरे यांचा यामध्ये सिंहाचा वाट आहे.
शिक्के काढण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही पण कटआउट लावले. शिक्के काढण्यासाठी शंभर पुरावे देतो. तुम्ही एकच पुरावा द्या. आमदार झालो शिक्के निघाले आम्ही आमदार नसतो तर शिक्के निघाले नसते. हे सगळे लबाड लोक आहेत. उद्योजकांना पाठीशी घालतात शेतकऱ्यांची काही घेणे देणे नाही. अशी टीका आमदार लंके यांनी केली.