Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे ५० क्युसेसने दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले आहे सिना धरणातून शेती सिंचनासह पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या श्रेयवादावरून पुन्हा एकदा दोन्ही आमदारांमध्ये आवर्तन सोडण्याकरिता स्पर्धा दिसून आली.
सध्या सिना लाभक्षेत्रात शेतातील उभी पिके, फळबागा, जनावरांसाठी चाऱ्याची व पाण्याची आवश्यकता असल्याने आवर्तन सोडण्याची मागणी होत असताना त्या अनुषंगाने आ. रोहित पवार यांनी सीना धरणातून आवर्तन सोडण्याबाबत कुकडी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली.
तर एकीकडे सिना धरणातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत आ. प्रा. राम शिंदे यांनी कुकडी कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना पत्र देऊन आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या. या दोन्ही आमदारांच्या मागणीचे पत्र मात्र आवर्तन सुटण्याआधीच सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही आमदारांच्या या पत्रांची चांगलीच चर्चा झाली.
यापूर्वी सोशलमिडियावर आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आरोप – प्रत्यारोपासह सोशल मिडियावर वेगवेगळी पोस्ट व्हायरल झाले. सिनाच्या पाण्याचे नेहमीच राजकारण होत असल्याने यावेळी देखील पुन्हा एकदा पाण्याचे राजकारण झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत तसेच मागील काही दिवसांपासून आ. शिंदे व आ. पवार या दोन्ही आमदारामध्ये कर्जत, जामखेडमधील विविध विकास कामांच्या मुद्यावर आरोप प्रत्यारोप होत असताना अनेकदा श्रेयवादाकरिता चांगलीच जुंपल्याचे कर्जत-जामखेडकरांनी पाहिले आहे.
हे वादळ शमते न शमते तोपर्यंत एकीकडे आज सिना धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुसरे उन्हाळी आवर्तन आ. शिंदे यांच्या सुचनेवरून सोडण्यात आले असल्याचे त्यांचे समर्थक सोशल मिडीयावर फोटो व पोस्ट टाकून सांगत आहेत तर दुसरीकडे आ. पवार यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन पाठपुरावा केल्याने ठरलेल्या नियोजनानुसार मागणीच्या अनुषंगाने हे आवर्तन पूर्ण दावाने सोडण्यात आल्याचे त्यांचेही समर्थक सोशल मिडियावर फोटो व पोस्ट करत सांगत आहेत.
त्या अनुषंगाने कर्जत, जामखेडमध्ये आ. शिंदे व आ. पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई हा मुद्दा सोशल मिडियाद्वारे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत मात्र आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना सर्वसामान्य जनतेमधून पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे