राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या दुफळीच्या पार्शभूमीवर नगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने तालुका महाआघाडीची बैठक घेत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचा नारा दिला.
त्यास २४ तास उलटायच्या आतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार निलेश लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत गेलेले असताना नगर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट अशा महाआघाडीची नुकतीच बैठक घेत तालुका महाआघाडी खा. शरद पवार यांच्या सोबत कायम असल्याचे जाहीर केले होते. गौरव नरवडे हे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक ओळखले जातात.