राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकत असं म्हटलं जात. यात जर कार्यकर्ते वाढीव प्रेम करणारे असले तर मग सांगताच सोय नाही. मागील काही दिवसांत आपण अनेक नेत्यांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा ऐकल्या आहेत. यात अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा राधाकृष्ण विखे असतील.
या चर्चाही रंगल्या त्या कार्यकर्त्यांमुळेच. म्हणजेच वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा पाट्या, पोस्टर लावल्यामुळे. आता एका नवीन नावाची चर्चा रंगलीय ती देखील अशाच एका पोस्टरमुळे. आता कर्जत जामखेडचे आमदार प्रा. राम शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले व राजकारणात चर्चा सुरु झाल्या.
भाजपाचे विधान परिषेदेचे आमदार राम शिंदे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागल्याची एक पोस्ट व्हायरल झाली व नगर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असल्याने व ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट झाल्यामुळे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्तेही जोरदार कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांतही मोठा उत्साह दिसून येत आहे. यातच काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बॅनर झळकवत असल्याने राजकीय चर्चांनाही ऊत येत आहे.
याआधीही रोहित पवार, राधाकृष्ण विखे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते व आता यांच्यापाठोपाठ भाजपचे आमदार राम शिदे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट एका कार्यकर्त्याने व्हायरल केल्याने चर्चा रंगली आहे.
काय आहे या पोस्टमध्ये? :- भाजप आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर उत्साही कार्यकर्त्याने शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पोस्टमध्ये केला व ही पोस्ट व्हायरल झाली. विविध भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता राम शिंदे यांची देखील एंट्री झाल्याने या शुभेच्छा पोस्टरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.