महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध रंग पाहायला मिळत आहेत. आज जो एकासोबत आहे तो उद्या दुसऱ्या कुणासोबत दिसेल हे सांगता येणे अशक्य आहे. आता अहमदनगर मधील राजकारण देखील आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने बदलू शकते.
सध्या अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे व माजी आ. शिवाजी कर्डीले ही भाजपची जोडगोळी फुल फॉर्म मध्ये आहे. दरम्यान आता माजी आ. शिवाजी कर्डीले हे आ. संग्राम जगताप यांना भाजपात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.
या आधी स्वतः खा. सुजय विखे यांनी आ. जगताप यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले आहेच. आता ‘तुम्हाला सत्तेत राहण्याची आणि मंत्रिपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते’ असे म्हणत कर्डिले यांनी आता आ. जगताप यांना भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली आहे.
शहरातील बोल्हेगावमधील राजे छत्रपती संभाजीनगर येथील स्व. विशालभाऊ वाकळे पाटील उद्यानात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांनी सर्वांशीच संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आदींसह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
कोणाला कोणत्या पक्षात जावे लागेल याची खात्री नाही :- यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, की कोणाला कोणत्या पक्षात जावे लागेल याची खात्री नसल्याने यापुढे पक्षाचा उल्लेख करू नका. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही तर आता तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो असे कर्डीले म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काही जण दोरीत वागतात पण टायचा काही फायदा होत नसतो. माझे सर्वांशी चांगले संबंध असल्यामुळे मी कधी आमदार झालो हे मलाही कळलं नाही असे ते म्हणले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विकासकामे करण्याचा सल्ला दिला.
आमदारकीसाठी पैसा शिल्लक ठेवा :- यावेळी बोलताना माजी आ.कर्डीले यांनी अनेक चिमटेही काढले. ते म्हणाले की, विकासकामातून लोकांचे प्रेम आणि विश्वास जिंकता येतो हे कुमार वाकळे यांनी सिद्ध केलं आहे. पण आता अनावश्यक जास्त पैसे खर्च करू नका.
आमच्या आमदारकीसाठी पैसा शिल्लक ठेवा, मग आम्ही देखील तुम्हाला महापालिका निवडणुकीत मदत करू असा टोला त्यांनी सर्वानाच लगावला. असेही म्हणाले की, नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असल्याने तुम्ही आत्ताच महापालिका निवडणुकीचा विचार करू नका.
आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील तेव्हा आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मगच आम्ही तुम्हाला मदत करू असे साकडेच कर्डिले यांनी तेथे असणाऱ्या नगरसेवकांना साकडे घातले व राजकीय चर्चांना सुरवात झाली.