Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

Published on -

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे.

याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या प्रश्नावर मंत्री विखे यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, अनेक इच्छुक आहेत. त्या सर्वांच्या नावाची चर्चा होत आहे.

पक्षाच्या निरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे. त्यावर मुख्य निवडणूक समिती निर्णय घेईल. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे वेळ लागतो आहे असे ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राचे इमारतीचे उदघाटन मंत्री विखे पाटील यांच्या होते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महानाट्यावर लवकरच पडदा पडेल :- महानाट्य दोन किंवा जास्तीत जास्त तीन अंकी असते. त्यावर लवकर पडदा पडेल. महानाट्य फारकाळ चालणार नाही. लोकसभेसाठी कोण कुठे जाते, याची मला चिंता नाही.

कारण महायुतीला राज्यात शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसते याला मी फार महत्त्व देत नाही, असा टोला मंत्री विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेवर लगावला आहे.

मराठा आरक्षणावरही वक्तव्य :- मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेने ते मान्य केलेले आहे. महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे विजय वडेट्टीवारांना वाटत असेल, तर ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सभागृहात तसे सांगितले पाहिजे होते.

तेव्हा तर ते म्हणाले, एकमताने ठराव करा. आता त्यांना कोणती उपरती सुचली आहे? मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद केले पाहिजे, असा टोला महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांना लगावला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप केला होता.

त्यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, वडेट्टीवार यांचे वक्तव्य राजकीय आहे. सभागृहात त्यांनी १० टक्के आरक्षणाला पाठिंबा दिला. एकमताने ठराव झाला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचे राजकारण आता बंद करावे आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण कसे टिकेल यासाठी जबाबदारीने भाष्य करावे, असेही त्यांनी वडेट्टीवार यांना सुनावले. मनोज जरांगे यांनी आता आंदोलन थांबवावे, मी म्हणेल तेच सरकारने, मराठा समाजाने ऐकावे ही भूमिका सोडावी.

आरक्षणामुळे मराठा समाजाला संधी मिळाली आहे. यापुढे त्यांनी १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असाही सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe