Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय गणिते जो तो आपल्या पद्धतीने आखत आहे. दरम्यान आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. सुपा एमआयडीसीत सगळे खंडणीखोर जमा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. शिर्डीतील माध्यमांशी बोलताना विखे यांनी हा इशारा दिला.
माजी आमदार नीलेश लंके यांनी प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार असल्याची घोषणा प्रचाराचा नारळ वाढविताना केली आहे. यासंदर्भात शिर्डी येथे पत्रकारांनी विखे पाटील यांना छेडले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
नीलेश लंके यांच्या प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार असल्याच्या घोषणेवर बोलताना ते म्हणाले, ते विनोद करू शकतात याचेच मला आश्चर्य वाटते. सुपा एमआयडीसीत खंडणीखोरी व गुंडगिरी सुरू आहे.
जिल्ह्यात औद्योगिक वातावरण तयार होत आहे. माजी महसूलमंत्र्यांचे ज्यांनी आशीर्वाद घेतले, त्यांना हे का सुचले नाही, की औद्योगिक वसाहतींसाठी शिर्डी, अहमदनगर, महामंडळाच्या बेलवंडी येथे जागा देण्याचे धोरण घ्यावे, वेळ आल्यावर सगळे बोलू, बऱ्याच भानगडी बाहेर येतील बऱ्याच भानगडी आहेत. त्या योग्यवेळी बाहेर काढू, असा इशारा देखील दिलाय.
दक्षिण उत्तर असा भेदभाव करू नका
विखे पाटील हे दक्षिणचे खासदार आहेत. मात्र, पंतप्रधानांसह सर्व नेत्यांचे कार्यक्रम उत्तरेत घेतात, या आरोपाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, दक्षिण-उत्तरेचा प्रश्न नाही. नेते जिल्ह्यात येतात, ही स्वाभिमानाची बाब आहे. सहकाराचा जन्म झाला तेथे नेते येतात, यात वावगे काय? हा संकुचित दृष्टिकोन असल्याचे ते म्हणाले.
इशारा कुणाकडे ?
सुपा एमआयडीसीत खंडणीखोरी व गुंडगिरी सुरू आहे.सुप्यातील खंडणीखोरांचा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा जो विखे पाटील यांनी दिला तो इशारा नेमका कुणाला होता? कुणाकडे निशाणा होता? यावर सध्या चर्चांना जोर आला आहे.