Ahmednagar Rain : मुसळधार पावसामुळे चक्क रस्त्यांवरील चारचाकी गाड्या होत्या पाण्यात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील आनंदी बाजार परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी-चारचाकी वाहने बुडाली. तीन वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात धुवाधार पावसाने नगर शहरात पाणीच पाणी झाले.

यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहरात दिसून आले होते. अहमदनगरमध्ये शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाने हजेरी लावली आहे.

नगर शहरासह पाथर्डी,नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या होत्या.

महापालिकेच्या गटारी साफ केल्याचा दावा या पावसाने धुवून काढला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अनेक रस्त्यांना नाल्याचे रूप आले. शहरासह जिल्ह्याच्या सर्वदूर भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

या पावसाने सोयाबीनची पिकेही पाण्याखाली गेले आहेत. कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे वाहनचालकांची गोची…

अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात वाहने बंद पडल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली होती तर, अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातल्याने दुचाकी चालक पाण्यात घसरून पडल्याच्या घटना समोर आल्या. पाण्यातून वाहने काढताना अनेकांना कसरत करावी लागली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe