अहमदनगर हादरले ! खून प्रकरणी सातजण अटकेत

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथील हनुमंत दामोधर आवारे याचे अपहरण झाल्यानंतर त्याचा मृतदेह शेंडी शिवारात आढळून आला होता. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून समजली.

इमामपूर येथील हनुमंत आवारे या तरुणाचे बुधवार दि. १३ रोजी घराजवळून अपहरण केल्याबाबत भाऊ कृष्णा आवारे याने फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्याचा तपास करताना एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी करत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

त्यानंतर मयताचा भाऊ कृष्णा आवारे याचा पुरवणी जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यामध्ये मयत हनुमंत आवारे हा बुधवारी गोठ्यावर झोपायला जात असताना त्याला रस्त्याच्या भांडणाच्या कारणावरून महेश आवारे (रा. इमामपूर) शुभम भाऊसाहेब आहेर (रा. वडगाव गुप्ता) बाळू छबुराव भगत (रा. शेंडी) महेश कैलास पठारे, दीपक साळवे (रा. शिंगवे नाईक) महेश कुसमाडे, गोपाल कराळे (रा. शेंडी) यांनी कारमध्ये उचलून त्याचे अपहरण केले.

त्याला शेंडी गावच्या शिवारातील भैरोबा खोरीतील रावसाहेब विठ्ठल कराळे यांच्या मक्याच्या शेतामध्ये नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिथे असलेल्या तारेचा करंट देऊन त्यास ठार मारून टाकले आहे. असा पुरवणी जबाब देण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

हनुमंत आवारे याचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अपहरणातील गाडीमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस

अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शुभम आहेर व बाळू भगत या आरोपींकडे पोलिसांनी अपहरणात वापरलेल्या गाडी बद्दल चौकशी केली असता, सदर गाडीमध्ये फॉल्ट झाला असून गिअर बॉक्स तुटल्याची माहिती आरोपींनी दिली.

त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडीचा फॉल्ट कोठे झाला याची विचारणा करताच त्यांनी हनुमंत आवारे याला आम्ही कच्च्या रस्त्याने शेंडी शिवारात सोडल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला त्या परिसरात शोधमोहीम राबवली असता त्यांना मृतदेह आढळून आला व खुनाचा प्रकार समोर आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe