अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- राहुरी कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपी उक्कलगाव येथे नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला.(Rahuri Jail)
त्यावर बेलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस गेले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
राहुरी कारागृहाचे गज कापून पाच आरोपी फरार झाले होते. त्यापैकी तिघांना पकडण्यात पाेलिसांना यश आले. मात्र, दोघे आरोपी अजूनही पसारच आहेत.
पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यातील एक आरोपी नितीन ऊर्फ सोन्या माळी हा त्याच्या उक्कलगाव येथील नातेवाईकाकडे आला असल्याची खबर पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली होती.
सायंकाळी माहिती मिळताच बेलापूर पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. मोटारसायकलचा आवाज येताच आरोपी पोलिसांच्या समोरच जवळच असलेल्या उसाच्या शेतात घुसला.
उसाचे क्षेत्र मोठे असल्याने पोलिसांनी रॅपिड अॅक्शन फोर्सचे पथक पाचारण केले. मात्र, सायंकाळ झाल्याने व उसाचे क्षेत्र मोठे असल्याने तो पसार झाला.
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, उपयोग झाला नाही. दरम्यान, आरोपी फरार झाल्याने त्या आरोपीला पकडण्याचे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम