लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित !

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. साऱ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटात बंद दाराआड जागा वाटपावर खलबत देखील सुरू झाले आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. यामुळे आता मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागला आहे. नगर बाबत बोलायचं झालं तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीने जिल्ह्यात करिष्मा करून दाखवला होता.

जिल्ह्यातील बारा पैकी सहा जागा एकसंध राष्ट्रवादीने काबीज केल्या होत्या. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात नेहमीच चांगले यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत गेल्या काही पंचवार्षिकित राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चमकदार कामगिरी करता येत नव्हती. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने नगर दक्षिणची जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाला नगरमध्ये चांगले यश मिळाले आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाची जिल्ह्यात चांगली चमकदार कामगिरी करण्याचे प्रयत्न राहणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचे देखील असेच प्रयत्न राहणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आतापासूनचं तयारी सुरू केली आहे.

खरेतर राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख प्राप्त शरद पवार आणि त्यांच्याच राजकारणाच्या शाळेत अनेक वर्ष राजकारणाचे धडे गिरवलेले अजित दादा या दोघांना नगर जिल्ह्याची राजकीय नस, सहकाराच्या जाळ्याची, त्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची खूपच चांगली जाण आहे. या दोन्ही नेत्यांचे नगर जिल्ह्यावर विशेष प्रेमही आहे.

नगर जिल्हा महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच गेम चेंजर राहिला आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याच राष्ट्रवादीच्या संधीसाठी दोन्ही नेत्यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नगर मधूनच केली आहे.

यावेळी तटकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीला ज्या-ज्या जागा मिळाल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. म्हणजेच या जागांची आत्तापासूनच चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये होणाऱ्या जागावाटपात या जागा आपल्याकडेच राहतील याकडे विशेष लक्ष देऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान तटकरे यांच्या अगोदर शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवासाठी नगरची निवड करून महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाचेही नगरच्या या जागांवर लक्ष असल्याचे संकेत दिले आहेत. खरतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चार आमदार अजित दादांकडे आणि दोन आमदार शरद पवार यांच्याकडे होते. मात्र पुढे निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश घेत लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून उमेदवारी करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.

यामुळे शरद पवार गटाचे नगर मधील वर्चस्व सिद्ध झाले आहे. आता महायुतीच्या जागा वाटपांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये गेल्यावेळी एकसंध राष्ट्रवादीला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या जागा पुन्हा एकदा हे दोन्ही गट आपल्यालाच मिळावेत यासाठी आग्रही राहणार आहेत. या सहा जागांवर या दोन्ही गटांच्या माध्यमातून दावा केला जाणार आहे.

खरे तर महाविकास आघाडी मधील ठाकरे गटाचा नगर जिल्ह्यात एकही आमदार नाही आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तसेच महायुतीमध्ये शिंदे गटाचा एकही आमदार नाहीये आणि भाजपाचे तीन आमदार आहेत. म्हणजेच नगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ ठरणार आहे.

यामुळे नगर जिल्ह्यातील जागा वाटप करताना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिले जाण्याची शक्यता आहे. किंबहुना हे दोन्ही गट आपल्या मित्र पक्षांवर या जागांसाठी दबाव बनवणार आहेत. यामुळे महायुतीकडून अजितदादा यांच्या गटाला आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटाला विधानसभा निवडणुकीसाठी किती जागा मिळतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe