जिल्ह्यतील शाळांना कोरोनाचा विळखा; विद्यार्थ्यांसह पालक चिंताग्रस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा हळूहळू पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच आता जिल्ह्यातील शाळा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागल्या आहेत.

नुकतेच जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६ विदयार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.

यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सात विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत १६ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. इतरांची तपासणी सुरू होती.

हे विद्यार्थी सहावी ते बारावी या वर्गातील आहेत. तेथील वसतिगृहात ते राहतात. काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचा निर्णय झाला.

एक एक करता त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने तेथे धाव घेतली. बाधित आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना पारनेरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe