अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी गोविंद अण्णा मोकाटे याला त्वरित अटक करून, त्याच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआय च्या (गवई) वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे कि, नगर तालुक्यातील इमामपूर येथील गोविंद मोकाटे एका महिलेवर अनेक दिवसापासून लैंगिक शोषण करत होता.
लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे मोकाटे याच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल होऊन देखील मोकाटे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
नगर तालुक्यामध्ये मोकाटे याचे मोठे राजकीय वर्चस्व आहे. जिल्ह्यातील मोठे राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याने राजकीय दबावापोटी त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
मोकाटे याने एका सर्वसाधारण मागासवर्गीय महिलेचे सातत्याने लैंगिक शोषण केले आहे. पीडीत महिला मागासवर्गीय असल्याने मोकाटे याच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जाण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम