अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- शेती पिकातून शेतकर्याला मिळालेल्या 90 हजार रूपयांवर दोन चोरट्यांनी डल्ला मारला होता. कोतवाली पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेली 90 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्याला ती परत देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, केतन पोपटराव शेंडगे (रा. भूषणनगर, केडगाव) यांच्याकडे शेती पिकातून आलेले 90 हजार रूपये एफडी करण्यासाठी ते महात्मा फुले चौक, मार्केटयार्ड येथून वाहनातून घेऊन जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी शेंडगे यांच्या वाहनास धडक दिली होती.
त्यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांच्याशी वाद घातले. वाहनामध्ये ठेवलेली रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी शेंडगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू असताना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हेल्मेट गँगला अटक केली होती. या गँगमधील जिग्नेश दिनेश घासी याच्याकडून 90 हजाराची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सदरची रक्कम शेंडगे यांना परत दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम