थकबाकीपोटी वीज तोडल्यानं जामखेडच्या शेतकऱ्यानं उचललं हे पाऊल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- थकबाकीपोटी शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीम महावितरण कंपनीनं हाती घेतली आहे. या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांपासून गावातील रास्तारोकोपर्यंत आंदोलनं होत आहेत.

जामखेड तालुक्यातील एका शेतकऱ्यानं मात्र थेट वीज रोहित्रावर चढून शोले टाइप आंदोलन केलं. रोहित्रावर (डीपी) चढून वीज वाहक तारा हातात घेऊन हा शेतकरी बसून राहिला.

वीज पुरवठा बंद असल्यानं त्याचा जीव वाचला. जामखेड तालुक्यातील खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम या शेतकऱ्यानं हे आंदोलन केलं.

गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली घेतलं. खुरदैठन परीसरातील शेतकर्‍यांचे वीज बील थकल्यामुळं विद्युतरोहीत्र (डीपी) बंद केली आहेत.

कदम यांच्या शेताजवळील कदम वस्ती येथील विद्युत रोहीत्र वीजबील थकल्यामुळं दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांना शेताला पाणी देता येत नाही.

संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युत रोहित्रावर चढत चक्क वीज तारा हतात घेतल्या. वीज कनेक्शन पूर्ववत करा, अन्यथा आत्महत्या करतो, असा इशारा त्यांनी दिला.

मात्र, त्यावेळी मेन लाइनमधील वीज पुरवठा खंडित झालेला होतो. त्यामुळं त्यांना काहीही झालं नाही. याची माहिती मिळाल्यावर खुरदैठनचे सरपंच ओंकार डुचे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठाकरे, शहाजी डुचे, ग्रामसेवक इम्रान शेख, ऋषिकेश डुचे अब्बास सय्यद यांच्यासह गावकर्‍यांनी कदम यांची समजुत काढून त्यांना खाली उतरविले.

त्यामुळं पुढील अनर्थ टळला. या घटनेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषिकेश डुचे यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे.

शेतकऱ्यांची पिके व फळबागांना पाण्याची अवश्यकता आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीनं वीज कनेक्शन तोडले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलनं केली.

मात्र सरकारला जाग येत नाही. त्यामुळं आता हतात काठ्या व कुऱ्हाडी घेण्याची वेळ आली आहे.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe