एमआयडीसी प्रकरणी काकाही ऐकेनात ! रोहित पवारांचा पारा चढला, म्हणाले बिनडोक व्यक्तीचं ऐकून सरकार…

Ahmednagarlive24 office
Published:
Rohit Pawar

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून ‘रण’ पेटले आहे. एमआयडीसी हा जामखेड कर्जतमधील अत्यंत महत्वाचा मुद्दा असल्याने श्रेयवादासाठी भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढाई सुरु आहे. केवळ एक सही बाकी होती बाकी एमआयडीसी झालीच होती. परंतु आ. राम शिंदे यांची यात एंट्री झाली आणि त्यांनी परस्पर ही जागा बदलून एमआयडीसी दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव मांडला.

विशेष म्हणजे हा लगेच मंजूरही झाला. यावर आ. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा देखील सुरु केला पण त्यांना प्रतिसाद मिळाला तर नाहीच पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्यावर आमदार शिंदेंची बाजू वरचढ केली.

त्यामुळे आता आमदार रोहित पवार यांची टीकेची धार अधिकच वाढली असून त्यांनी महायुती सरकारवर टीका करत आमदार शिंदे यांचे नाव न घेता बिनडोकं म्हणत जेव्हा सरकार बिनडोक माणसांचे ऐकते तेव्हा सामान्य लोकांचे खूप नुकसान होते असा घणाघात केला आहे.

काय म्हणाले आ. रोहित पवार ?

जेव्हा सरकार बिनडोक माणसांचे ऐकते तेव्हा सामान्य लोकांचे खूप नुकसान होत असते. माझ्या मतदारसंघात देखील हेच होताना दिसतेय. एका बिनडोक व्यक्तीचे ऐकता ऐकता सरकार एवढ्या पातळीवर गेलं आहे की सरकार विकास विसरून गेलं असल्याची टीका त्यांनी केली.

अजित पवार यांनी भूमिका बदलल्यानंतर ते पूर्वीची स्टाईल विसरत असतील, तर हे चुकीचे आहे, असे आ. पवार म्हणाले. मी कर्जतचा आमदार आहे. व मी लोकांना शब्द दिला आहे. पण फक्त राजकीय विरोधातून एमआयडीसीचा निर्णय प्रलंबित केला जात असेल तर तो एकट्या माझा विषय नाही, तर अख्ख्या मतदारसंघाचा विषय आहे.

जनतेला दिलेला शब्द मला पाळता येत नसल्याचे दुःख आहे.
पुढे ते असेही म्हणाले की जर अजित पवार एमआयडीसीला विरोध करणाऱ्या व्यक्तीला साथ देत असतील तर पुतण्या म्हणून मला नक्कीच वाईट वाटणार असून अजित पवार यांना विनंती आहे, की कोण खरे आणि कोण खोटे हे त्यांनी पाहावे आणि एमआयडीसीबाबतचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe