अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यांना प्रत्येकी दहा मते मिळाली.
त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, शिवसेनेचे नवनाथ सोबले व विद्या गंधाडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुप्रिया शिंदे यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारात वाहनात थांबल्या.
त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. भारतीय जनता पक्षाचे एकमेव नगरसेवक अशोक चेडे यांनी विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या विशेष सभेला दुपारी १२ वाजता सुरूवात झाली.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सुरूवातीला नगराध्यक्ष पदासाठी व त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले.
सभागृहात उपस्थित सर्व १६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर विजयी झाल्याचे पिठासिन अधिकारी सुधाकर भोसले यांनी घोषीत केले.
पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. समस्या अनेक आहेत. पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या दोन- तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
निवडणूक संपली आहे. निवडणुकीच्या निमीत्ताने झालेले वाद विरोध विसरून शहरातील प्रत्येक प्रभागात कामे करावीत. प्रत्येकजण शहराचा नागरीक आहे, याचे भान ठेवून नगरसेवकांनी कामे करावीत.
नगर पंचायतीची विकेट काढली आहे. नजिकच्या बाजार समिती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही निश्चीतपणे विरोधकांची विकेट काढणार आहे.” नीलेश लंके, आमदार.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम