शेतजमिन, पोल्ट्रीशेडवर ताबा; व्यापाऱ्याला धमकी

Mahesh Waghmare
Published:

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील व्यापाऱ्याच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शेत जमिनीत अनोळखी ४ ते ५ जणांनी अतिक्रमण करत पोल्ट्री शेडवर ताबा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतमालकालाच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दमबाजी करण्यात आली.

या प्रकरणी त्या अनोळखी ४ ते ५ जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुदर्शन दिलीप डुंगरवाल (वय ४२, रा. सिताबन लॉन्स जवळ, कोठी रोड, मार्केट यार्ड) यांनी सोमवारी (दि. ६) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी यांचा नगर शहरात व्यापार असून त्यांची नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट गावच्या शिवारात गट नंबर २१० मध्ये ३ हेक्टर ४३ आर एवढी शेत जमीन आहे. फिर्यादी डुंगरवाल हे सोमवारी (दि.६) दुपारी १ च्या सुमारास शेत जमिनीत फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या शेतात बंद स्थितीत असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये ४ ते ५ इसम अनाधिकाराने वास्तव्य करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

डुंगरवाल यांनी तेथे जावून त्यांना तुम्ही माझ्या शेतात असलेल्या माझ्या मालकीच्या पोल्ट्री शेडमध्ये काय करता ? अशी विचारणा केली असता, त्या अनोळखी इसमांनी डुंगरवाल यांना दमबाजी सुरु केली.आम्ही येथेच राहणार आहोत, ही जागा आमची आहे.आमच्या नादी लागू नका, तुम्ही इथून लगेच निघून जा.

नाहीतर तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी ४ ते ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गांगुर्डे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe