Ahmednagar News : कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांनी आई, वडील, भाऊ, नवरा, बायकोला गमावले. कित्येकजण कोरोना महामारीमुळे अनाथ झालेत. कोरोनामुळे अनेकजण पोरके झालेत. दरम्यान, पारनेर मध्ये कोरोना काळात तत्कालीन आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने भाळवणी येथे कोविड सेंटर उभे केले होते. याला शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटर असे नाव देण्यात आले होते. मात्र याच कोविड सेंटरवर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निलेश लंके कोविड काळात त्यांनी कोरोना रुग्णांसाठी काय-काय काम केले याची यादी देतात, त्यांच्या कोविड सेंटरचे गुणगान गातात पण आता लंके प्रतिष्ठानच्या या कोविड सेंटरवर काही गंभीर आरोप लावले जात आहेत. या कोवीड सेंटरचे कोणतेही दप्तर उपलब्ध नाही. त्यामुळे येथे किती रुग्ण दाखल झाले होते, किती रुग्णांवर उपचार देण्यात आले याची कोणतीही अधिकृत सरकारी आकडेवारी उपलब्ध नाहीये असा गंभीर आरोप पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी केला आहे.
यामुळे सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात याची चर्चा रंगू लागली आहे. औटी यांच्या आरोप गंभीर आहेत यामुळे या प्रकरणाकडे साऱ्या नगरकरांचे लक्ष लागले आहे. यावेळी औटी यांनी, या कोविड सेंटर मध्ये ज्या रुग्णांची प्रकृती खालावत होती ते रुग्ण येथून नगरला हलविण्यात येत असताना रुग्ण दगावत असल्याचा बोभाटा होण्याची शक्यता असल्याने येथील रुग्ण पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले गेलेत अन मग तेथे ते मयत झाल्याचे दाखवले गेलेत.
हेच कारण आहे की, पारनेरमधील ग्रामीण रुग्णालयातील दुसर्या लाटेतील मृत रुग्णांचा आकडा हा १११ वर गेल्याची नोंद झाली आहे. पण हा आकडा खरा नाहीये. कारण की, प्रतीक्षात मयत रुग्णांची संख्या यापेक्षा जास्त आहे, असा गंभीर आरोप केला आहे. विशेष बाब अशी की लंके प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह जिल्हा सरकारी रुग्णालयात देखील नोंद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या कोविड सेंटर मध्ये कोविड काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावलेत. रुग्णांची येथे मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली. यामुळे या कोविड सेंटरचे नाव दप्तरातून गायब केले गेले असा गंभीर आरोप यावेळी केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी दप्तरात पारनेर कोविड सेंटर मध्ये 12, भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये दोन आणि पारनेर ग्रामीण रुग्णालयात 97 असे एकूण 111 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
शिवाय विजय औटी यांनी कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या होत्या त्या देणग्यांचे काय झाले असा सवाल ही उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानला पारनेर, नगरसह मुंबई- पुण्यातून आणि संपूर्ण देश आणि देशाच्या बाहेरुन म्हणजेच कॅनडा, अमेरिका, रशिया येथूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली.
प्रतिष्ठानच्या खात्यावर आलेल्या या रकमेचा विनियोग नीलेश लंके व त्यांच्या समर्थकांनी कशासाठी केला हे जनतेसमोर यावे अशी मागणी विजय औटी यांनी यावेळी केली आहे. याशिवाय, त्यांनी लंके प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरला मिळालेले हजारो टन धान्य, पाणी बाटल्या, अंडी भाजीपाला इत्यादींची खुल्या विक्री झाली असल्याचा आरोप केला आहे.
या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड होत असे आणि येथे गुंडगिरी सुरु होती असे विविध आरोप औटी यांनी यावेळी केले आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. अशातच लंके यांच्यावर काही गंभीर आरोप झाले असल्याने लंके याच्यावर काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र औटी यांचे आरोप खूपच गंभीर असून या प्रकरणात चौकशी होणार का हे देखील पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.