अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राला मोठा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, प्रगल्भ महाराष्ट्र घडविण्याचे काम संतांनीच केले आहे. त्याच भक्तिमार्गाच्या वाटेवरून चालत ही परंपरा जोपासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.
त्यामुळेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असतानाही यावर मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारने खंडित होऊ दिली नाही.

असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पारनेरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, पारनेर शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव निधी देण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सर्वेक्षण झाले असून यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना करीत पाणी योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोना अजून गेलेला नाही. रशिया, चीन, युरोप या देशात पुन्हा तिसरी लाट आल्याचे सांगत कोरोनाविषयी हलगर्जीपणा न करता गांभीर्याने काळजी घेण्याची तसेच दोन्ही लसीकरण करून घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारच्या अर्थकारणावर पर्यायाने विकास कामांवरही परिणाम झाल्याचेही ते म्हणाले. आमदार निलेश लंके यांनी ढवळपुरी परिसरात एमआयडीसी झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असे सांगत या परिसरात एमआयडीसीला मंजुरी देण्याची मागणी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम