करंजी- तालुक्यातील कान्होबावाडी येथे प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एक सहशिक्षक आहे. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या शाळेत तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी केंद्रातील करंजीपासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण देणारी शाळा आहे. शाळेची इमारत चांगली आहे. आवार स्वच्छ आहे. मूलभूत सुविधा आहेत. ग्रामीण भागातील पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याचा झाल्याने व खाजगी शाळांच्या बसेस घरापर्यंत येत असल्याने विद्यार्थी शाळेऐवजी स्कूलमध्ये जातात.

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अथवा शिक्षक अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी संख्या पुरेशी नसतानाही शाळा टिकविली जाते, अशी चर्चा उघडपणे या परिसरात होत आहे. शाळेची पटसंख्या एवढी चिंताजनक असताना अधिकारीसुद्धा मूग गिळून गप्प आहेत. पहिली आणि तिसरीच्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीच नाहीत. दुसरी आणि चौथीसाठी प्रत्येकी चार विद्यार्थी आहेत.
अशा आठ विद्यार्थ्यांना दोन शिक्षक शिकवत आहेत. दोन पैकी एकच शिक्षक उपस्थित होते. दुसऱ्याची चौकशी केली असता, त्यांची आज राजा आहे, असा व्हाट्सअप मेसेज त्यांनी मला पाठवला आहे, असे उपस्थित शिक्षकाने सांगितले. विद्यार्थी नसल्याने शिकवणार कुणाला म्हणून शिक्षकसुद्धा बोअर होतात. या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुढील वर्गात घातले आहे. या शेऱ्या शिवाय फारसे ज्ञान काही मिळू शकेल, याबाबत आता पालकांनाच विश्वास वाटत नाही.
आठ विद्यार्थी व दोन शिक्षकांची शाळा असल्याने येथे अधिकाऱ्यांच्यासुद्धा नियमित भेटी होत नाहीत. खात्याला शिक्षकांच्या सेवेची काळजी लागल्याने त्यांच्याकडून सुद्धा वरिष्ठांना वस्तुस्थितीजन्य अहवाल दिला जातो की नाही याबद्दलही शंका व्यक्त होत आहे. शासनाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा खर्च होऊनही ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती असेल तर याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
प्राथमिक शाळांमध्ये जिथे अत्यल्प विद्यार्थी असतील त्या शाळा इतर शाळांना जोडून विद्यार्थ्यांना खऱ्या शिक्षणाची सोय होण्याची गरज आहे. याबाबत मुख्याध्यापक संदीप आंधळे यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले खाजगी शाळांच्या बस गाड्या विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत येतात. शाळेपासून दूर अंतरावर असलेले विद्यार्थी याच खाजगी शाळेच्या बसमध्ये जाऊन शिक्षण घेतात, त्यामुळे प्राथमिक शाळेला विद्यार्थी मिळत नाहीत. असे असले तरी येथील प्राथमिक शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात असून, शाळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.