Pathardi News : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असून, लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे. ग्रामीण भागाचा विचार करता डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात वैद्यकीय अद्ययावत सोईसुविधांचा अभाव आहे.
तालुक्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय हे पाथर्डी शहराच्या ठिकाणी असून, येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे, त्यामुळे रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले असून, अनेक गरजू रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात, त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहून आर्थिक भूर्दड सहन करावा लागतो.
लोकसंख्येचा विचार करता आरोग्य सेवा तोकडी असून, परिपूर्ण आरोग्य सेवेसाठी वाढीव बेडच्या सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पाथर्डी तालुका हा मोहटादेवी, मढी, वृध्देश्वर, आनंदऋषीजी महाराज, भगवानगड, कानिफनाथ मढी, या तिर्थक्षेत्रांना संलग्न असून, राज्यातून लाखो भाविक येथे येतात.
वैद्यकिय सुविधा व जास्तीचे बेड रुग्णालयात गरजेचे असून, तालुक्यातील जनतेसह तिर्थक्षेत्री येणा-या भाविकांना उपचारासाठी वैद्यकिय सेवा अपुऱ्या पडतात. येथे सुविधा वाढवण्यासाठी आंदोलने, उपोषण व रुग्णालयास टाळे ठोकण्यात आले; परंतू याची दखल घेतली जात नाही.
तालुक्यातील जनतेसाठी चांगल्या सुविधांसह शंभर बेडची तरतुद व्हावी, अशी वारंवार मागणी जिल्हाधिकारी, वैद्यकीय उपसंचालक, आरोग्य मंत्रालयाकडे करण्यात आली. तालुक्याची वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची तरतूद करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.