अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-___________ अहमदनगर : बिअर बार व परमिट रुमचा परवाना काढण्यासाठी नगरपालिकेचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नगररचना विभागात कार्यरत लिपिक अंबादास गोपीनाथ साठे (वय ४४, रा. पाथर्डी) याने पाथर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो अडकला नाही, मात्र त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने मुख्याधिकाऱ्यांचे नाव घेतल्याने त्यांच्याकडेही यासंबंधी चौकशी सुरू आहे.
तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्याने लिपिकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही लाच मुख्याधिकाऱ्यांसाठी आहे, असंही त्याने तक्रारदाराला सांगितलं. यासंबंधी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार उपअक्षीधक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कशी केली कारवाई
लाच मागितल्याची पडताळणी करण्यासाठी २६ नोव्हेंबरला पंच आणि तक्रारदाराला पाठवण्यात आले. त्यावेळी आरोपी साठे याने २५ ऐवजी १२ हजार रुपयांच्या लाचेत काम करून देण्याचं मान्य केलं. मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने लिपिक साठे १२ हजार रुपयांची लाच मागत असल्याचं पंचांसमोर रेकॉर्ड झालं. त्याने लाचेची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात सापळ्यात मात्र तो अडकला नाही. मात्र, त्याने लाचेची मागणी केल्याचा पुरावा पथकाकडे होता. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार आरोपी साठे याच्याविरूद्ध ३१ डिसेंबरला पाथर्डी पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर करत आहेत. या कारवाईत पुष्पा निमसे, पोलीस नाईक रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, राहुल डोळसे या पोलीस अधिकारी, अंमलदरांनी भाग घेतला. साठे याने लाचेची मागणी करताना पाथर्डी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे त्यांचा खरोखर संबंध आहे की त्यांच्या नावाचा गैरवापर करून लाचेची मागणी केली जात होती, याची चौकशी सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम