१४ जानेवारी २०२५ वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त, दूषित व तेलकट पाणी सोडल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.यामुळे नदीतील हजारो मासे मृत पावले असून या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
प्रवरा नदी, जी अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाते,सध्या काळेभोर व तेलकट पाण्याने भरलेली दिसत आहे.कारखान्यांमधून सोडलेल्या रासायनिक सांड पाण्यामुळे हे संकट ओढवले आहे.दूषित पाण्यामुळे पिण्यासाठी आणि वापरासाठी असलेले पाणीही प्रदूषित होऊन जनजीवनावर विपरित परिणाम होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आणि संबंधित विभागाकडे या दूषित पाण्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नदीतील सांडपाण्याची तपासणी करून ते पुनः प्रक्रिया झाले आहे की नाही, हे तपासून यावर कठोर उपाय योजना करावी,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.प्रवरा नदीतील पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर समस्या आहे.प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची नदी संकटात
प्रवरा नदीचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी याच प्रवरेच्या काठी वास्तव्य केले. रणछोडदास जाधव यांनी खेद व्यक्त करताना सांगितले की, प्रवरा नदीने कधी काळी लोकांना अमृताचा अनुभव दिला, मात्र आता ती दूषित पाण्याने भरून वाहत आहे.
रोगराईची भीती
नदीकाठच्या बोरवेलमधून पाथरे गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो; मात्र दूषित पाणी भूगर्भातील जलस्रोतांमध्ये मिसळल्याने हे पाणी पिण्यासाठी अयोग्य ठरत आहे.यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.या संदर्भात ग्रामस्थांनी दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्पेंट वॉश कारणीभूत ?
कारखान्यांतून सोडले जाणारे ‘स्पेंट वॉश’ (स्पिरिट उत्पादनादरम्यान निर्माण होणारा रासायनिक कचरा) हा पाणी खराब होण्यास प्रमुख कारणीभूत आहे.यामुळे जलस्रोत नष्ट होत असून पर्यावरणीय हानी होत आहे.सांडपाणी प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे,मात्र सध्या ते नदीत सोडले जात असल्याचे दिसत आहे.