राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावर अद्यावत ग्रामीण रुग्णालय बांधकामास सुरुवात ; ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Karuna Gaikwad
Published:

११ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुर्णविराम मिळाला असून शहरातील जुन्या जागेऐवजी राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील नवीन जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत होत आहे. ३० बेडचे सुसज्ज अशा रुग्णालयासाठी ५.५ कोटी रुपये निधीचा पहिला टप्पा मंजूर झाल्यानंतर कामकाजास प्रारंभ झाला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी येथील शासकीय कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय बांधणीसाठी रेल्वे स्टेशन हद्दीतील जागेची निवड केली होती.लोकसभा निवडणूकीपूर्वी ग्रामीण रुग्णालय इमारत कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला होता.

शहरातील शासकीय कार्यालय व ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्यास माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी विरोध दर्शविला होता. मात्र आ. शिवाजीराव कर्डिले व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय राहुरी स्टेशन रस्त्यावरील सरकारी जागेवर होण्यासाठी प्रयत्न केले. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जागेवर बांधकाम करण्यास मूळ मालकाने विरोध केल्याने वाद आहे. विधानसभा निवडणूकीत ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा गाजला होता.

परंतू विधानसभा निवडणूक होताच राहुरी ग्रामीण रुग्णालय बांधकाम नियोजनाला वेग प्राप्त होऊन शासनाकडून पहिल्या टप्यात ५.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी दिली. राहुरीचे ग्रामीण रुग्णालयासाठी ५.५ कोटीचा निधी मिळणार असून पहिल्या टप्यात सुसज्ज इमारत बांधकाम होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवास इमारत बांधकाम होणार आहे. राहुरी शहरापासून १.५ किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशन रस्त्यावरील प्लॉट क्रमांक ७१३ या १ हेक्टर १४ आर क्षेत्रावर बांधकामास प्रारंभ झाले आहे.

संबंधित जागेवर असलेली झाडे तोडण्याची परवानगी प्राप्त होताच जमीन सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सपाटीकरण पूर्ण झाल्यानंतर इमारत बांधकामास प्रारंभ होणार आहे. नाशिक येथील एका ठेकेदाराला कामाचे टेंडर मिळाले असून दर्जेदार काम व्हावे, अशी अपेक्षा राहुरीकरांना लागलेली आहे. कामकाज पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सोपविली आहे.

त्यानुसार राहुरी पंचायत समितीचे बांधकाम अभियंता सुमित घोरपडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ३० बेड असलेली दुमजली इमारत बांधकामास लवकरच प्रारंभहोणार आहे. इमारत बांधकामासाठी ६.५ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ५.५ कोटी रुपये मंजूर होऊन २ कोटीचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, राहुरी स्टेशन रोडवरील सरकारी जागेत राहुरी ग्रामीण रुग्णालयाची इमारत होणार असल्याने त्याचा लाभ राहुरी शहरासह तालुक्यातील इतर गावांना देखील होणार असल्याने सामान्य नागरिकांमधून रुग्णालय बांधकाम सुरू झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. तर आता प्रशासकीय कार्यालय इमारत बाबत काय निर्णय होणार याची देखील उत्सुकता वाढली आहे.

आ. कर्डिले व माजी खा. डॉ. विखेंच्या प्रयत्नाला यश

राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व्हावे म्हणून अनेकांनी आंदोलन, उपोषण केले. विधानभवनातही लोकप्रतिनिधींनी मुद्दा नेत निधीची मागणी केली. मात्र आ. शिवाजीराव कर्डिले, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून तब्बल १५ वर्षांनंतर ग्रामीण रुग्णालय निधीला मंजुरी देत प्रत्यक्षात बांधकामास प्रारंभ झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe