राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अटकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. ट्राफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर संदेश देण्यात आला आहे.
रॉंग साईडचा प्रकार वाढत चालल्याने वाहतूक ठप्प
राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेषतः राहुरी कॉलेज ते बस स्थानक दरम्यान, अनेक वाहनचालक फुटलेल्या डिव्हायडरमधून रॉंग साईडने वाहने टाकून ट्राफिक जामची समस्या निर्माण करत आहेत. या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी राहुरी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने पथके उभारून कार्यवाही केली.

महामंडळाच्या बसवरही कारवाई
दिनांक 11 मे रोजी अकलुज डेपोची एसटी बस (MH-14-BT-4224) चालकाने ट्राफिक जाम टाळण्यासाठी रॉंग साईडने बस चालवली. परिणामी जाम अधिक वाढला. त्यामुळे संबंधित बसवर MVA 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कलमानुसार चार हजार रुपयांपर्यंत दंड व सहा महिने ते एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे.
बस स्थानकांना पत्रव्यवहार करून सूचना
एसटी बस चालकांकडून वारंवार रॉंग साईड वाहन चालवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने, दिनांक 11 मे रोजी राहुरी बस स्थानक प्रमुख व श्रीरामपूर आगार प्रमुख यांना लेखी पत्र देऊन याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद करून पोलिसांनी आता प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.
पोलिसांचे आवाहन
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणीही रॉंग साईडने वाहन चालवून वाहतुकीत अडथळा निर्माण करू नये. भविष्यात अशा प्रकारची कारवाई राहुरी शहरासह राहुरी फॅक्टरी परिसरातही नियमितपणे करण्यात येणार आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पीएसआय आहेर, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, फुलमाळी आणि सचिन ताजणे यांच्या पथकाने केली. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.