पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू ; राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील घटना

Sushant Kulkarni
Published:

१० जानेवारी २०२५ राहुरी : येथील कृषी विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी संकेत तरटे हा दहावीचा विद्यार्थी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कालव्याच्या पाण्यात बुडाला होता.काल गुरूवारी (दि. ९) सकाळच्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात यश आले आहे.तालुक्यातील डिग्रस येथे एका तरुणाला घटना स्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना सापडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे संकेत तरटे, ओम जगदाळे, युवराज मोरे, तेजस कांदे तसेच आणखी एकजण, असे पाचजण १० वी च्या वर्गात शिक्षण घेत आहेत. बुधवारी (दि. ८) सदर पाच विद्यार्थी शाळा बुडवून विद्यापीठ परिसरात असलेल्या पाटात पोहायला गेले होते.

सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यापैकी संकेत श्रीपती तरटे (रा शहरी) व तेजस कांदे (रा. डिग्रस, ता. राहुरी) हे दोघेजण कपडे काढून पोहण्यासाठी कालव्याच्या पाण्यात उतरले होते.त्यांना पोहता येत नसल्याने दोघांपैकी संकेत तरटे हा विद्यार्थी पाण्यात बुडून वाहून जाऊ लागला.

तेव्हा त्याला वाचविण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा देखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ उडून त्याने आरडाओरडा केला. तेव्हा कालव्या जवळच राहणारे प्रशांत गावडे, भानुदास रोडे, अजय गावडे या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

त्यांनी तात्काळ कालव्याच्या पाण्यामध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी त्यांनी तेजस कांदे या मुलाला पाण्याच्या बाहेर काढून वाचविले.त्याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र संकेत तरटे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुळा उजवा कालवाचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला.मात्र बुधवारी उशीरा पर्यंत त्या मुलाचा शोध लागला नव्हता.

अखेर काल गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान, राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे एका तरुणाला घटना स्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला.

यावेळी परिसरातील राहुल गायकवाड, म्हाळु हळोनोर, अविनाश भिंगारदे, सोनू कोकाटे, अक्षय गोसावी या तरुणांनी कालव्याच्या पाण्यात उतरून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.यावेळी परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe