Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन २०२२-२३ गाळप हंगामात प्रथम हप्ता रुपये २३०० प्र. मे.टन याप्रमाणे पेमेंट केलेले होते. सदर गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट रुपये २२५ प्र. मे. टन याप्रमाणे दिले असून,
त्याची पंधरा कोटी रक्कम सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे. मागील सीझन मधील उसास २५२५ प्रमाणे पेमेंट आदा केलेले असून येणारी दिवाळी सुद्धा गोड करणार असल्याची माहिती नागवडे यांनी दिली.
तसेच ऊसतोड वाहतूकदार यांचे तोड वाहतूक व कमिशनचे पेमेंट पूर्णपणे अदा केले असून पुढील गळीत हंगामा करिता करार सुरू करण्यात आलेले आहेत. नागवडे कारखान्याने कायम ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचा विचार केलेला असून त्यांना योग्य न्याय दिलेला आहे.
कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन अदा केले असुन उर्वरित पेमेंट पुढील महिन्यात देण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले. स्व. शिवाजीराव (बापू) नागवडे यांच्या विचार प्रेरणेने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये कधीही मागे राहणार नाही व सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
त्यामुळे ऊस वाहतूकदार यांनी लवकरात लवकर करार करावेत व सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस नागवडे कारखान्यास देऊन उच्चांकी गाळप करण्याकरिता सहकार्य करावे. असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.