अहमदनगरमध्ये दरोडा टाकून वैजापूरला ठोकला मुक्काम; पोलिसांनी माग काढत आवळल्या मुसक्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल- 26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्‍हाडे याच्या टोळीने दरोडा टाकला होता.

या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 26 रा. गणेश चौक, बोल्हेगाव, नगर) व अमोल सटवा कापसे (वय 23 रा. कॉटेज कॉर्नर, नगर, मूळ रा. पैठण जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुर्‍हाडे टोळीविरूध्द मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ सराईत आरोपींचा समावेश आहे. एमआयडीसीत दरोडा टाकल्यानंतर आरोपी पसार झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केली आहे. पसार आरोपींपैकी सतिष शिंदे व अमोल कापसे हे दोघे वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे असल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपी शिंदे व कापसे यांचा वैजापूर येथे शोध घेवून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe