अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली फरार महिला सिंधु कलावती कचरे (वय 62) हिला सात वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदे दुमाला (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथून ताब्यात घेत अटक केली.
तिच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिला न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे. शिक्षा झाल्यानंतर ती फरार झाली होती.
दादासाहेब सहादु रोकडे (वय 61 रा. राहुरी) यांची मुलगी कल्पना हिला तिचा पती वसंत अर्जुन पवार व सिंधु कचरे यांंनी मारहाण करत रॉकेल टाकून पेटवून दिले होते.
14 जानेवारी 1992 रोजी ही घटना घडली होती. नगरमधील खासगी रूग्णालयात कल्पनावर उपचार सुरू असतान तिचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी दादासाहेब रोकडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वसंत पवार व सिंधु कचरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपींना जिल्हा न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. आरोपींनी शिक्षेविरूध्द उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते.
खंडपीठाने शिक्षा कायम केली होती. आरोपी वसंत पवार याने शिक्षा भोगली होती.दरम्यान शिक्षा कायम झाल्यानंतर आरोपी सिंधु कचरे फरार झाली होती. तिला सात वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे.