Shevgaon News : लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने मुलीचा मृत्यू

Shevgaon News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील इंदिरानगर भागात दुर्गा देवीची स्थापना केलेल्या लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने निकिता काळुराम मोरे (वय ८) हिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.

मयत निकिताचे वडिल काळुराम विष्णु मोरे (वय २९) हे ऊसतोड कामगार असून, मूळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत; परंतु कामानिमित्त ते पाच वर्षांपासून बोधेगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहतात.

ऊसतोडणी कामासाठी जाताना मुलगी निकिता व मुलगा निखील यांना सासरे काळुराम यल्लप्पा मासाळकर यांच्याकडे सोडून गेले होते. गुरुवार, दि. १९ रोजी दुर्गादेवीची स्थापना केलेल्या मंडपातील खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने लखन किसन धोत्रे यांचा मुलगा सुरज लखन धोत्रे याला शॉक लागला असता,

यासंदर्भात संबंधितांना इलेक्ट्रिक लाईटींग दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले होते; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवार, दि. २० रोजी मुले खेळत असताना निकिता हिचा विद्युत प्रवाह उतलेल्या पोलला हात लागल्याने शॉक बसून तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुलीचे वडील व आईने बोधेगावकडे धाव घेऊन यासंदर्भात जबाबदार असलेल्या इसमाविरोधात शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर गांवडे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe