शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.३) भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार यांना तब्बल तास बसवून ठेवले.
याबाबत तक्रारदार यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारुती वस्तीत चोरट्याने भरदिवसा रामनाथ ढेसले यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपये किंमतीचे सोने व रोकड घेऊन पसार झाले.
शेतात बाजरीला पाणी देण्यासाठी आणि पत्नी किर्तनाला गेली असता बंद घराचे कुलूप तोडून ही घटना घडल्याने हतबल झालेल्या ढेसले यांनी फिर्याद दाखल करण्यासाठी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलिस स्टेशन गाठले.
परंतु पोलिसांच्या अजब कारभारामुळे फिर्याद लिहून घेण्यासाठी थोडं थांबा म्हणत त्यांना रात्री १० वाजेपर्यंत ताटकळत उभे रहावे लागले.
रामनाथ लक्ष्मण ढेसले यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी पोलिसांनी केलेल्या दिरंगाईच्या विरोधात संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करून चोरट्यांचा शोध घेऊन अटक करावी, अशी तक्रार प्रशासनाकडे ईमेलद्वारे दाखल केली आहे.