नगरच्या तहसीलदारांची वृद्धाने थेट महसूलमंत्र्यांकडे केली तक्रार… ‘हे’ आहे कारण

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या गैरकारभाराविरोधात थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या तक्रारींची गंभीर दखल घेत महसूलमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त यांना तहसीलदार पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार शेतकरी सखाराम तुकाराम गीते हे तालुक्यातील निंबळक गावामध्ये शेती करतात.

ते करत असलेल्या शेतीवर 2002 पासून ते 2017-18 पर्यंत यापूर्वीच्या सर्व तहसीलदारांनी नियमाप्रमाणे रितसर पीक पाहणीची नोंद केली आहे. मात्र, 2018-19 ची पीक पाहणी लावण्यासाठी तहसीलदार पाटील यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.

ती आपण पूर्ण केली नाही म्हणून त्यांनी जवळपास सोळा वर्षांपासून महसूल विभागाने लावलेली पीक पाहणी खंडित करून अन्याय केल्याचे गीते यांचे म्हणणे आहे.

2019-20 च्या पीक पाहणी वेळी देखील हाच प्रकार झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकर्‍याच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत महसूलमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना सदर प्रकरणाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अवैध संपत्तीची चौकशी व्हावी… नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली असून या संपत्तीची देखील चौकशी लाचलुचपत विभागाकडून विभागीय आयुक्तांच्या मार्फत व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe