बोरं घेण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले! तिने चोरट्यांची मोटारसायकलच पकडून ठेवली परंतु…?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- रस्त्याच्या कडेला बोरं विकणाऱ्या एका वृद्ध महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी बोरं घेण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेच्या अंगावरील ६८ हजार रुपयांचे दागिने लुटण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे फाटा येथे घडली.

मात्र महिलेने धाडस दाखवत त्या भामट्यांची दुचाकी ओढून धरल्याने चोरट्यांना ती सोडून पळून जाण्याची वेळ आली. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथील जनाबाई निवृत्ती सांगळे (वय ६५) या खेर्डे फाटा येथे रस्त्याच्या कडेला बोरे विकत होत्या.

यावेळी दोन चोरटे दुचाकीवरून आले, त्यातील एकाने बोरे विकत घेण्याचा बहाणा केला तर एकजण लघुशंकेला जातो, असे सांगत सांगळे यांच्या मागील बाजूला गेला व त्याने मागून सांगळे यांचा गळा पकडत दोघांनी त्यांच्या गळ्यातील दागिने,

नाकातील नथ व कमरेच्या पिशवीतील रोकड, असा ६८ हजारांचा ऐवज घेऊन पळून जाऊ लागले. मात्र, चोरट्यांची दुचाकी सुरू न झाल्याने ते दुचाकी ढकलत असताना सांगळे यांनी त्यांची दुचाकी पकडून ठेवत आरडाओरडा केला.

हा प्रकार जवळपास दहा मिनिटे चालू होता. चोरट्यांनी सांगळे यांना दुचाकीपासून हटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाल्याने चोरटे दुचाकी तेथेच टाकून फरार झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe