अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, चेडगाव रस्त्यावरील तरवडे यांच्या वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकला.
यावेळी घरातील सुमारे २० हजार रूपये रोख रक्कम व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री एक ते दीडच्या सुमारास रावसाहेब बापू तरवडे यांच्या घरी चोरटे आले. अगोदर त्यांनी रावसाहेब यांचा मुलगा मनोज तरवडे यांच्या घराच्या खोलीची बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर रावसाहेब तरवाडे व त्यांच्या पत्नी यांच्या खोलीत शिरले.
गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी रावसाहेब तरवडे यांना मारहाण करत घरातील रोख रक्कम व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. आरडाओरडा ऐकून मनोज तरवडे यांना जाग आली. मात्र आपल्या तुमची बाहेरून कडी लावल्याचे समजताच त्यांनी शेजारी राहणारे चुलत भाऊ, चुलते यांना फोन केला.
शेजारील लोक काही वेळात बाहेर आले. मनोज तरवडे यांनी शेजारील लोकांना फोन लावल्याचे लक्षात येताच त्या दोघा चोरट्यांनी सावध पवित्रा घेत पळ काढला. मनोज तरवडे व त्यांच्या चुलत बंधू, चुलते व शेजारी राहणाऱ्या तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेडगावच्या दिशेने पळालेले चोरटे पकडले जाण्याच्या धास्तीने काही अंतरावरच ऊसात शिरले. घटनेची माहिती समजताच एकत्रित आलेल्या तरुणांनी परिसर पिंजून काढला. दरम्यान मुळा धरणाच्या उजव्या कॅनल लगत त्यांना एक दुचाकी आढळून आली. मात्र सदर गाडीचा नंबर संशयास्पद व चुकीचा वाटत असल्याचे समजते.
सदर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन, वांबोरी पोलीस दूरक्षेत्र व नगर येथील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक तुषार धाकवार यांच्यासह सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेले रावसाहेब बापू तरवडे यांना नगर मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
रात्रीच्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने सदर घटना गांभीर्याने घेवून चोरट्यांचा शोध घ्यावा. अशी मागणी ब्राम्हणी, चेडगाव परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम