पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना ! आमदार लंके यांनी…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच आगळावेगळा शपथविधी पार पडला आहे. विधानसभा आणि लोकसभेत आमदार-खासदारांना देतात तशी शपथ पारनेर नगरपंचायतीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

जनसेवेची शपथ ही शपथविधी आमदार लंके यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून पारनेर नगर पंचायतीने राज्यासमोर एक वस्तुपाठ ठेवल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की, पदाधिकारी आणि अधिकारी हे दोन चाके आहेत.

त्यांनी सोबत काम केल्यानंतर नक्कीच विकास जलद गतीने करता येईल. पारनेर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबरोबरच इतर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी विविध पातळीवर पाठपुरावा केला जाईल. विरोधात काम करणे सोपे असते, मात्र जेव्हा सत्तेत आपण येतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सर्व जनतेचे असतात. त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता शहरातील सर्वांची कामे झाली पाहिजेत. या शहराच्या विकास कामांसाठी आमदार म्हणून आपल्या दोन पावले पुढे जाऊन काम करील, असा विश्वासही लंके यांनी दिला.

नगरपंचायत निवडणुकीत पारनेरला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीला कोणालाच बहुमत मिळाले नव्हते. मात्र, नंतर राजकीय हालचाली झाल्या आणि अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीचे बहुमत झाले. नगराध्यक्षपदी विजय सदाशिव औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची निवड करण्यात आली.

या नव्या पदाधिकाऱ्यांना पदभार स्वीकारताना त्यांच्यासह नगरसेवकांनाही शपथ देण्यात आली. सुरुवातीला कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून नंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली. आमदार लंके यांनी नगराध्यक्ष विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सोबतच सर्व नगरसेवकांनाही जनसेवेचे व्रत स्वीकारण्याची शपथ दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रथमच अशा प्रकारे शपथविधी पार पडल्याचं पाहायला मिळालं. त्याला घटनात्मक आणि कायदेशीर अधार किती आहे, यापेक्षा संबंधित पदाधिकारी आणि नगरसेवकांना यामुळे आपल्या कर्तव्याची जाणीव झाली, हेही तेवढंच महत्वाचं आहे.

दरम्यान, नव्या नगराध्यक्ष-उपनगराध्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने हा आगळावेगळा शपथविधी पार पडला. यावेळी माजी सभापती सुदाम पवार, जेष्ठ नेते राजेंद्र चौधरी, अॅड राहुल झावरे, डॉ. बाबासाहेब कावरे, विजय डोळ,

संदीप चौधरी यांच्यासह नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. विधिमंडळ आणि संसदेत सदस्यांना शपथ दिली जाते म्हणजे अनुक्रमे आमदार व खासदार शपथ घेऊन कामकाज सुरू करतात.

या व्यतिरिक्त राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडतो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदग्रहण करत असताना अशा प्रकारे शपथ घेऊन कामकाजाला सुरुवात करण्याची पहिलीच वेळ असावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe