अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही.
जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळेल.

त्यासाठीचा प्रस्ताव मी मांडतो. सर्वांनी या प्रस्तावाला मंजुरी द्यावी. तरच जिल्ह्यात आपला पक्ष सरस राहील. जिल्ह्यात टिकेल. अशी मागणी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची भाजप कोअर कमिटीत निवड झाली. या निमित्त त्यांचा पेमराज सारडा महाविद्यालयात भाजपतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
या प्रसंगी शिवाजी कर्डिले म्हणाले की, राम शिंदे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली आहेत म्हणून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत भाजप कोअर कमिटीत घेतले आहे.
त्याचे चिज करण्याच जबाबदारी त्यांच्यावर आहे. मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाही. मी पाच वेळा आमदार झालो. मंत्री झालो. म्हणून राम शिंदे यांना संधी मिळावी. त्यासाठी मीच ठराव मांडतो.
असे म्हणत कर्डिले यांनी ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे.