नागरिकांची सतर्कता : भर दुपारी मोबाईल टॉवरमधील एसी चोरणारे पाचजण रंगेहाथ पकडले..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सध्या चोरटे देखील रात्रीच्या वेळी चोऱ्या करण्याचे टाळत असून भरदिवसाच घरे फोडत आहेत. अलीकडे तर चोरटे कोणती वस्तू चोरतील हे सांगणे अवघड झाले आहे.

मात्र आता नागरिक देखील सतर्क झाले आहेत. नुकताच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथील कोळगाव येथे एका मोबाईल कंपनीच्या टावरमधील चार टन वजनाचा ए.सी.भर दुपारी चोरुन नेत असताना परिसरातील नागरिकांनी पाच जणांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

महादेव चौधरी ( रा.आठवड ता.नगर), नसरुद्दीन अदालती अली, अजमेर मगदूर अली, महबूब फारूक अली, कलंबर रियाज मुनां अहमद (सर्व रा. पिसोले पेट्रोल पंपाजवळ कात्रज पुणे मूळ रा. गुरमुट्टा ता.नानपारा) अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत.

या बाबत सविस्तर माहिती अशी, सकाळी ११ च्या सुमारास कोळगाव येथे अशोक मेहत्रे यांच्या शेतातील मोबाईल कंपनीच्या टावरमधील चार टन वजनाचा ए.सी. (एमएच १२ एफ ९७९६) या पिक अप मधून चोरुन घेऊन जात होते.

दरम्यान शंका आल्याने त्यांची चौकशी केली असता हा प्रकार समोर आल्याने परिसरातील नागरिकांनी वरील पाच जणांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe