Ahilyanagar News: राहुरी- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटीक्सच्या वापरामुळे येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडणार आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि त्याचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
मंगळवारी (दि. ६) रस्तोगी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेट देऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला. या भेटीनंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर आणि शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्याच्या गरजेवर जोर दिला.

शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान
रस्तोगी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काटेकोर शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, कृषी विद्यापीठांनी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारून पारंपरिक विद्यापीठांशी सामंजस्य करार करावेत, अशी सूचना त्यांनी केली. सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पात विद्यापीठाने एआयवर केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी कृषी यंत्रे आणि अवजारे निर्मितीत एआयचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाशी समन्वय साधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
राहूरी विद्यापीठात AI च्या संदर्भात मोठा डाटा तयार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांनीही विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाने एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग आणि मोठा डेटा तयार केला आहे, जो कृषी क्षेत्रात एआयच्या वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या डेटाचे संवर्धन करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र क्लाउड सिस्टीम विकसित करावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, पोकरा (प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकेल.
विद्यापीठ बियाणे निर्मिती, कृषी निविष्ठांच्या उत्पादनात अग्रेसर
राहुरी कृषी विद्यापीठ बियाणे निर्मिती आणि दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. विद्यापीठ कौशल्य आधारित शिक्षणाद्वारे कृषी उद्योजक तयार करण्यासाठीही प्रयत्नशील आहे, याकडे रस्तोगी आणि सिंह यांनी लक्ष वेधले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या ५० वर्षे जुन्या संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठाने आतापर्यंत बियाणे निर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत.