शेतीमध्ये AI तत्रंज्ञानाचा वापर केला जाणार! अजित पवारांची अहिल्यानगरमध्ये घोषणा, शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होऊन उत्पादनात होणार वाढ

जामखेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची घोषणा केली. यामुळे उत्पादन वाढून खर्च कमी होईल. यावेळी शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सामाजिक ऐक्य टिकवण्याचा संदेशही त्यांनी दिला.

Published on -

जामखेड- शहरातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याची मोठी घोषणा केली. “यंदाच्या अर्थसंकल्पात एआयसाठी मोठी तरतूद केलीय. आता ऊसासारख्या पिकांना किती पाणी लागेल, हे एआय सांगेल. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन दीडपट वाढेल,” असं त्यांनी सांगितलं. शेतीला नवी दिशा देणारं हे पाऊल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

याच कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम शिव, फुले आणि आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राजेंद्र गुंड, संध्या सोनवणे, बाळासाहेब नाहाटा, कपिल पाटील, अक्षय शिंदे, सचिन गायवळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

पवार यांनी जामखेडच्या विकासासाठी आपलं वचन पुन्हा एकदा अधोरेखित केलं. “जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून लवकरच मार्गी लावेन. रस्त्याचा हा प्रश्न कायमचा सोडवायलाच हवा,” असं त्यांनी ठासून सांगितलं.

कर्जत-जामखेडचा विकास करू

जामखेडमधील एसटीच्या समस्यांवरही त्यांनी भाष्य केलं. “काही प्रश्न अजून सुटलेले नाहीत. यापूर्वी रोहित पवार आमच्यासोबत होते, तेव्हा अडीच वर्षांत मी कोट्यवधींचा निधी आणला. आता ते सोबत नाहीत, पण सुदैवाने प्रा. राम शिंदे यांना महायुती सरकारने विधान परिषदेचे सभापती केलंय. त्यांच्यासोबत मिळून कर्जत-जामखेडचा विकास करू,” असं आश्वासन त्यांनी दिलं.

पवार यांनी सामाजिक ऐक्यावरही भर दिला. “काही ठिकाणी जात, धर्म, भाषा यावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय. पण आपण असलं काही होऊ देणार नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आपण एकजुटीने पुढे जाऊ,” असं ते म्हणाले. सर्वसमावेशक विकास हीच आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाबाबतही त्यांनी मोठी घोषणा केली. “चौडी येथील स्मारक असं असेल, की पुढच्या पिढ्यांना अहिल्यादेवींचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहील. त्यांनी बांधलेल्या बारवांपासून ते मंदिरांपर्यंत सगळं स्मारकात दिसेल. यासाठी मी राम शिंदे यांच्याशी बोलणार आहे,” असं पवार यांनी सांगितलं.

साफसफाईसाठी १०० रोबोट

शहरी भागातील ड्रेनेज साफसफाईच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केलं. “ड्रेनेजमधील गॅसमुळे मजुरांचा जीव जातो. आता राज्य सरकारने १०० रोबोट आणलेत. यापुढे ड्रेनेज साफसफाई रोबोट्स करतील, जेणेकरून मजुरांचा जीव वाचेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पवार यांच्या या घोषणांनी जामखेडमधील जनतेत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता या आश्वासनांची पूर्तता कशी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe