कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय या आधुनिक प्रणालीमुळे जग अधिक वेगवान होत आहे. आता हीच एआय टेक्नॉलॉजी पोलीस प्रशासनाचे काम अगदी सोपे करणार आहे. या टेक्नॉलॉजीच्या वापराने कोणत्याही गुन्ह्याचा तपास वेगवान, अधिक अचूक होणार आहे. भविष्यात ही प्रणाली गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकते. नेमका कशा पद्धतीनं याचा वापर होऊ शकतो त्यावर एक नजर टाकुयात.
पोलिसांना गुन्हेगारी शोधण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण झाले आहे. डेटा ओव्हरलोड हा मोठा प्रश्न आहे. हजारो तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून उपयुक्त माहिती शोधणे वेळखाऊ प्रक्रिया ठरते.

तसेच, मानवी संसाधनांची कमतरता, पोलिस दलातील अपुरी संख्या आणि वाढत्या गुन्ह्यांच्या तुलनेत तांत्रिक कौशल्य असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने तपासाची गती मंदावते. सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे डिजिटल फसवणूक, बनावट ओळखी आणि हॅकिंगच्या गुन्ह्यांचा मागोवा घेणे कठीण होत आहे. याशिवाय, डेटा गोपनीयता आणि कायदेशीर मर्यादा या तांत्रिक प्रगतीसमोर मोठ्या अडचणी ठरू शकतात.
यावरून स्पष्ट होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता पोलिस तपासात एक क्रांतिकारी भूमिका बजावत आहे. भविष्यकाळात आणखी सुधारित एआय प्रणाली पोलिसांना गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, एआयची प्री-डिक्टिव्ह पोलिसिंग प्रणाली विशिष्ट भागांमध्ये गुन्ह्यांची शक्यता ओळखून पूर्वनिर्धारित गस्त घालण्यास मदत करू शकते. तसेच, नॅचरल लर्निंग प्रोसेसिंग आधारित प्रणाली सोशल मीडिया किंवा कॉल डेटा विश्लेषण करून संशयास्पद संवाद टिपू शकते.
डीप लर्निंग मॉडेल्सच्या मदतीने गुन्हेगारांच्या हालचाली आणि सवयी ओळखून भविष्यातील गुन्ह्यांची शक्यता अंदाजे वर्तवली जाऊ शकते. यामुळे पोलिसांना गुन्हा घडण्याआधीच संशयितांवर लक्ष ठेवता येईल. एआय इनेबल्ड सर्व्हेलन्स सिस्टीम्सच्या मदतीने संशयास्पद हालचाली ओळखून तत्काळ इशारा दिला जाऊ शकतो.
या आधुनिक प्रणालीमुळे पोलिसांचा तपास वेगवान आणि अधिक अचूक होईल हे नक्की.