त्या समितीतून अजित दादा आऊट गडाख इन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सहकार आणि एकूणच राजकीय क्षेत्रात महत्त्वाची मानली गेलेल्या या समितीचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले होते. मात्र, आता त्यात सुधारणा करून सहकार मंत्र्यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे व मृद व जलसंधारण मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीतून बाहेर पडले असून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांचा यामध्ये समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना आता या समितीत स्थान मिळाले आहे. नव्या सरकारच्या काळात २ मार्च २०२० रोजी या समितीची रचना करण्यात आली होती.

त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अध्यक्ष, सहकार मंत्री व सहकार राज्यमंत्री सदस्य तर साखर आयुक्त सदस्य सचिव अशी रचना करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तर काँग्रेसकडून राज्यमंत्री डॉ. विश्विजीत कदम यांचा या समितीत समावेश होता.

शिवसेनेकडून मात्र समितीत कोणीही नव्हते. आता या समितीची फेररचना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांना समितीतून दूर करून सहकार मंत्र्यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. तर मृद व जलसंधारण मंत्र्यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या समितीत तिन्ही पक्षांना स्थान मिळाले आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश राजकारण सहकारी साखर कारखाने आणि बँकांवर अवलंबून असते. सध्याच्या परिस्थितीत सर्वच कारखान्यांना सरकारच्या मदतीची गरज पडत आहे. अशावेळी या समितीची भूमिका महत्त्वाची असते. सुरुवातीला उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री म्हणून अजित पवार यांचा यामध्ये समावेश केला असावा.

मात्र, आता पवार यापासून बाजूला झाले आहेत. मधल्या काळात यासंबंधी निर्णय घेताना ज्या घडामोडी घडल्या, त्याचेही यामागे कारण असल्याचे बोलले जाते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment