अकोल्याच्या महिलेला साईबाबा पावले अन् दृष्टीहीन महिलेला मिळाली नवी दृष्टी साईसंस्थानच्या आयबँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

Published on -

अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकताच सुरू झालेल्या अत्याधुनिक आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती.

त्या नेत्रदानाच्या माध्यमातून काल संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौदामिनी निघुते व त्यांच्या टीमने कौशल्यपूर्वक नेत्ररोपण शस्त्रक्रिया केली. या ऐतिहासिक घटनेने संस्थानच्या आरोग्य सेवेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पुढाकाराने व चेन्नई येथील साईभक्त डॉ. कोंडा संगीता रेड्डी यांच्या सहकार्याने संस्थानच्या रुग्णालयात अत्याधुनिक आय बँक स्थापन करण्यात आली.

या उपक्रमामुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींना प्रकाश मिळणार आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर साईनाथ रुग्णालयात या रुग्णाच्या हस्ते साई प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रुग्ण, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक (नि.), प्र. उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आहिरे, साईनाथ रुग्णालयाचे डॉ. अनघा विखे, डॉ. अक्षयकुमार साठे, डॉ. गोविंद कलाटे, डॉ. अशोक गावित्रे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,

जनसंपर्क अधिकारी (रुग्णालये) सुरेश टोलमारे, प्र. अधिसेविका नजमा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी नेत्रदानाबद्दल जनजागृती करून अधिकाधिक गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी यासाठी नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News